15 ऑगस्ट आणि श्रावण सोमवारपूर्वीच त्र्यंबक-जव्हार फाटा मार्गावर वाहतूक कोंडी; तब्बल दोन तास प्रवासी अडकले

बातमी शेअर करा

त्र्यंबकेश्वर : १५ ऑगस्ट, श्रावण सोमवार आणि सलग सुट्यांमुळे त्र्यंबकेश्वर नगरीत भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असतानाच आज त्र्यंबक-नाशिक रोडवरील जव्हार फाटा परिसरात वाहनांची मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे त्र्यंबकनगरकडे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध धार्मिक व पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी आजपासूनच मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक दाखल झाले. त्यामुळे वेळूळवाडी ते जव्हार फाटा परिसरात वाहनांची संख्या अचानक वाढली आणि वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली.

रस्त्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी मार्ग अरुंद होऊन वाहतूक एकेरी झाली आहे. त्यातच दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने वाहने आल्याने वाहनांची मोठी रांग लागली. काही प्रवासी व पर्यटकांना तब्बल दोन तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागल्याची माहिती आहे.वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची मोठी धावपळ सुरू होती. मात्र, वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद झालेला मार्ग यामुळे वाहतूक नियंत्रणात आणताना पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाली.दरम्यान, वाहतूक कोंडीमुळे अनेक पर्यटकांना नियोजित पर्यटनस्थळांना वेळेत पोहोचता आले नाही. काही प्रवासी व पर्यटकांनी वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी मधूनच परत जाण्याचा निर्णय घेतल्याचेही समोर आले आहे.येत्या १५ ऑगस्ट आणि श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्त्याचे सुरू असलेले काम, वाहतूक नियोजन आणि पर्यायी मार्ग याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »