इगतपुरी प्रतिनिधी: भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम अंतर्गत घोटी शाखा महिला व पुरुष कार्यकारणी व नालंदा बुद्धविहार ट्रस्ट घोटी शहर वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता नालंदा बुद्ध विहार, घोटी शहर येथे संपन्न होणार आहे.या जयंतीनिमित्त त्याग, संघर्ष आणि समतेचे प्रतीक असलेल्या माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित काव्यसंमेलन तसेच माता रमाई एकपात्री नाटिका या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य वेचणाऱ्या माता रमाई यांच्या विचारांचा जागर आणि प्रेरणा समाजापर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमास इगतपुरी तालुक्यातील सर्व सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, समता सैनिक, तसेच मान्यवर श्रामनेर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संरक्षक महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉ. हरीष रावलिया तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.समता, करुणा आणि प्रज्ञेचा संदेश देणारा हा कार्यक्रम घोटी शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात महत्त्वपूर्ण ठरणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा शाखा घोटी शहर महिला व पुरुष कार्यकारणीच्या वतीने करण्यात आले आहे.
