तिल्लोळी, ता. दिंडोरी, जि. नाशिक : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत तिल्लोळी येथे ‘हरित कुंभ’ अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देत ग्रामपंचायत परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.‘हरित कुंभ’ अभियानांतर्गत ग्रामपंचायत तिल्लोळीने ४०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यानुसार वृक्षारोपणाची कार्यवाही करण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच गाव परिसर अधिक हिरवाईने नटविण्याचा संदेश देण्यात आला.
या वृक्षारोपण कार्यक्रमास ग्रामपंचायत प्रशासक सौ. मनीषा रमेश भरसट, प्रशासक सदस्य श्री. दशरथ महादू बुरंगे, श्री. देविदास मोतीराम पवार, श्री. रामदास आबाजी भरसट, श्री. रमेश भरसट, श्री. कचरू भरसट, श्री. एकनाथ भरसट, श्री. वाल्मिक गायकवाड, श्री. दौलत मोरे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. आर. व्ही. मिस्तरी, मुख्याध्यापक श्री. राहुल प्रभाकर सोनवणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री. यशवंत खिल्लार, श्री. दिगंबर भरसट आणि सौ. कांचन पालवी यांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थितांनी “वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरणाचे संरक्षण करा” असा संदेश देत वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. केवळ वृक्ष लागवड न करता त्यांची नियमित देखभाल व संगोपन करण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.ग्रामपंचायत तिल्लोळीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गाव परिसरात हरित वातावरण निर्मितीस चालना मिळणार असून, पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणात पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
