तिल्लोळी, ता. दिंडोरी, जि. नाशिक : ग्रामपंचायत तिल्लोळी तसेच जिल्हा परिषद शाळा तिल्लोळी येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रामसभा तसेच ‘हरित कुंभ’ अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण प्रशासक तथा सरपंच सौ. मनीषा रमेश भरसट यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण एकल महिला श्रीमती अंजना रमेश गायकवाड व श्री. शंकर रामदास गांगोडे यांच्या शुभहस्ते पार पडले.स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगणारी मनोगते व्यक्त केली. तसेच शालेय कवायत, लेझीम, संगीत वाद्यांसह विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमास ज्ञानज्योती आश्रमशाळेच्या विद्यार्थिनी व कर्मचारीवर्गाची विशेष उपस्थिती होती. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. राहुल सोनवणे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी व दात्यांनी कोणत्याही स्वरूपात योगदान द्यावे, असे आवाहन केले.यावेळी शिक्षिका ज्योती तुंगार, वृषाली दहिवेलकर आणि कविता पाटील उपस्थित होत्या.जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी यापूर्वी ग्रामस्थांकडून ₹६७,५०० इतके योगदान प्राप्त झाले आहे. शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणखी दात्यांनी पुढे येऊन योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.यावेळी श्री. रामदास भरसट, श्री. रमेश भरसट आणि श्री. देविदास पवार यांनी शाळेसाठी प्रत्येकी दोन खुर्च्या साहित्य स्वरूपात देण्याची कबुली दिली. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याची आणि सामाजिक बांधिलकीची सकारात्मक भावना दिसून आली.विविध उपक्रम, विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त सादरीकरण आणि ग्रामस्थांचा शाळेच्या विकासासाठी असलेला सहभाग यामुळे तिल्लोळी येथील स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
