काळाराम मंदिर सत्याग्रह…आत्मसन्मानाच्या जाज्वल्य संघर्षाची आजच्या युवकांना दिलेली दिशा..!

बातमी शेअर करा

लेखन -किरण रामी बाबुराव मोहिते.मोबाईल – 9561883549

२ मार्च १९३०. नाशिकच्या गोदावरी तीरावर तणावपूर्ण शांतता पसरली होती. रामकुंड परिसरात ब्रिटिश पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. शहरातील प्रत्येक श्वासात एक अस्वस्थ प्रतीक्षा दाटली होती. कारण त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचा निर्णायक टप्पा गाठला जाणार होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक मुक्कामी या सत्याग्रहाची घोषणा केली आणि क्षणार्धात सर्वसामान्यांच्या अंगात नवचैतन्य संचारले. हा संघर्ष केवळ मंदिर प्रवेशासाठी नव्हता; तो मानवी प्रतिष्ठेचा आणि आत्मसन्मानाचा लढा होता. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते, आम्ही देवदर्शनासाठी नव्हे, तर आम्हालाही माणूस म्हणून मान्यता मिळावी यासाठी हा सत्याग्रह करीत आहोत. या विधानातच या आंदोलनाचा आत्मा सामावलेला आहे.सत्याग्रही कमिटीची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष म्हणून केशव नारायण वर्धेकर ऊर्फ बुवा यांची निवड झाली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सचिव होते, तर नाशिकचे शंकरराव गायकवाड कमिटीचे सभासद म्हणून कार्यरत होते. या कमिटीतर्फे महाराष्ट्रभर जनजागृती करण्यात आली. आंदोलन भावनेवर नव्हे, तर संघटित नियोजनावर उभे होते.

शंकरराव गायकवाड, मूळचे निफाड तालुक्यातील, पण नाशिकच्या मोठा राजवाडा परिसरात स्थायिक झालेले. रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. २ मार्च रोजी ते अंगरखा, धोतर, पुणेरी जोडा, पंचा, कपाळावर गंधाचे तीन आडवे पट्टे आणि मधोमध लाल टिळा अशा वेशात रामकुंडावर आले. क्षणभर परिसर स्तब्ध झाला. त्यांनी अंगावरील वेश उतरवला आणि “डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय” अशी गर्जना करत पाण्यात उडी घेतली.ही उडी केवळ पाण्यातील नव्हती; ती शतकानुशतकांच्या अपमानाविरुद्धची उडी होती. पोलिसांनी त्यांना बाहेर काढून बेदम मारहाण केली. बातमी वाऱ्यासारखी पसरली. ब्रिटिश जिल्हाधिकारी गार्डन रामकुंडावर दाखल झाले. सत्याग्रहींचा जोश, निर्धार आणि संघटित शक्ती पाहून त्यांनी रामकुंड व राममंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले.

सत्याग्रहाच्या यशानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी शंकरराव गायकवाड यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मोठा राजवाडा परिसरातील जाहीर सभेत त्यांच्या धाडसाबद्दल “बेलमास्तर” ही पदवी बहाल करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात जामीनदाराबद्दल विचारणा झाली असता त्यांनी ठामपणे सांआजच्या युवकांनी आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी या सत्याग्रहाकडे चिकित्सक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. हा संघर्ष कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हता; तो अन्याय्य सामाजिक रचनेविरुद्ध होता. डॉ. आंबेडकरांनी वारंवार सांगितले, “शिक्षण घ्या, संघटित व्हा, संघर्ष करा.” ही त्रिसूत्री आजही तेवढीच प्रभावी आहे.आज आंदोलन करणे सोपे झाले आहे; पण वैचारिक बांधिलकी जोपासणे कठीण झाले आहे. सोशल माध्यमांवरील घोषणा क्षणिक असतात; पण समाज परिवर्तनासाठी लागते ती संयमित, तत्त्वनिष्ठ आणि संघटित कृती. आपण व्यक्तींवर राग काढतो आहोत की व्यवस्थेला प्रश्न विचारतो आहोत..? आपण इतिहासातून द्वेष घेतो आहोत की दिशा घेतो आहोत…?काळाराम मंदिर सत्याग्रह आपल्याला शिकवतो की आत्मसन्मान हा दानाने मिळत नाही; तो संघर्षाने मिळवावा लागतो. समानता ही घोषणांनी नव्हे, तर कृतीने प्रस्थापित होते. स्वातंत्र्य आणि अधिकार हे जपावे लागतात; अन्यथा ते हातातून निसटतात.सत्याग्रही आंदोलकांना कोटी-कोटी वंदन करताना आपण केवळ स्मरणरंजनात रमू नये. त्यांच्या त्यागाचा अर्थ आपल्या कृतीत उतरवला, तरच त्या उडीचा, त्या मारहाणीचा आणि त्या कैदेचा खरा मान राखला जाईल. मंदिराची दारे उघडली तेव्हा इतिहास घडला; पण मनांची दारे उघडली तरच भविष्य उज्ज्वल होईल.आजचा युवक विवेक, तत्त्वज्ञान आणि संविधानिक मूल्ये यांची कास धरून पुढे गेला, तरच काळाराम सत्याग्रहाची ज्योत जिवंत राहील. अन्यथा तो केवळ एक स्मरणदिन ठरेल.सत्याग्रही आंदोलकांना कोटी-कोटी वंदन.(२ मार्च २०२६,आडगांव, नाशिक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »