रामदास आठवले यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीने त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवित निवेदन सादर केले.बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात ही भेट झाली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या समोर समितीचे मुख्य निमंत्रक महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, महाराष्ट्र सरकारने राबविण्याचा विचार केलेल्या उपवर्गीकरणाची राज्यात कोणतीही आवश्यकता नाही. महाराष्ट्रात कोणत्याही जातीने इतर जातींचे आरक्षण घेतलेले नाही. त्यामुळे समाजात मतभेद निर्माण होऊ नयेत म्हणून सरकारने उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊ नये आणि संबंधित अहवाल गुंडाळून ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आहे. येथे अठरापगड जाती गुण्यागोविंदाने राहत असून समाजात भांडणे लावणारा कोणताही निर्णय सरकारने घेऊ नये.यावेळी समितीचे प्रवक्ते प्रतिक पगारे, ज्येष्ठ नेते कैलासजी तेलोरे, ज्येष्ठ नेते एकनाथ मोरे, युवा नेते राहुल जगताप, सुशीलकुमार गायकवाड, दिलीप दूनबळे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
