कुंभमेळ्याच्या तयारीत ‘जनसेवा’ विस्कळीत; शासकीय कार्यालये स्थलांतरित झाल्याने त्र्यंबकेश्वरकरांची गैरसोय

बातमी शेअर करा

त्र्यंबकेश्वर : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरातील मंदिर परिसरात विविध विकासकामे व नियोजन सुरू आहे. त्यासाठी काही शासकीय कार्यालये तसेच आरोग्य विभागाचे उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर यांसह पंचायत समिती, तहसील कार्यालय आदी कार्यालयांचे ग्रामीण भागात, त्र्यंबक-नाशिक मार्गावरील परिसरात स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य, ग्रामीण, अशिक्षित आणि गोरगरीब नागरिकांना बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.शासकीय कामांसाठी किंवा आरोग्यसेवेसाठी त्र्यंबकेश्वर शहरातील नागरिकांना आता शहराबाहेर काही किलोमीटर अंतरावर जावे लागत आहे. विशेषतः वृद्ध, महिला, दिव्यांग, अशिक्षित तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी ही धावपळ मोठी अडचणीची ठरत आहे.

त्यातच सध्या श्रावण सोमवार आणि भाविकांची मोठी गर्दी असल्याने त्र्यंबक-नाशिक मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ आहे. खांबाळे परिसरात वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये किंवा रुग्णालयात जाणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना अतिरिक्त वेळ, प्रवासाचा खर्च आणि वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी शासकीय कार्यालयांचे स्थलांतर आवश्यक असले तरी ‘जनसेवा’ खंडित होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.देवाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये येतात; मात्र त्याच शहरातील नागरिकांना आरोग्यसेवा आणि शासकीय कामांसाठी पाच-सहा किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतरावर जावे लागत असेल, तर हा प्रश्न केवळ प्रशासनाचा नसून मानवी सुविधांचा आणि जनसेवेचा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कुंभमेळ्याच्या तयारीसोबतच स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून शासकीय कार्यालये व आरोग्यसेवेसाठी सुलभ, जवळची आणि कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.कुंभमेळा महत्त्वाचा आहेच; पण कुंभमेळ्याच्या तयारीत सामान्य माणूस भरडला जाऊ नये, याची काळजी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »