काळू गांगुर्डे (त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी) दि. १७ फेब्रुवारी २०२६ – मौजे शिरसगाव (त्र्यं) ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथे सन २०२३-२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या जलमिशन योजनेचे काम संबंधित ठेकेदाराकडून अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी नाशिक, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) नाशिक तसेच गटविकास अधिकारी, पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांना निवेदन देण्यात आले.वंचित बहुजन आघाडीचे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष मा. अरुणभाऊ काशिद यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शिरसगाव येथे जलमिशन अंतर्गत सुरू असलेले काम ठेकेदाराने अर्धवट ठेवले असून गावकऱ्यांना योजनेचा कोणताही प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. परिणामी नागरिकांना पाण्याच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
तसेच, सदर योजनेसाठी किती निधी मंजूर झाला आणि किती खर्च करण्यात आला याबाबत ग्रामस्थांना कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण योजनेची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.योजनेचे काम पुढील १५ दिवसांत पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.शिरसगाव येथे जलमिशनच्या कामात हलगर्जीपणा झाल्याच्या निषेधार्थ पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयात निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अरुण काशिद, जिल्हा प्रवक्ते सुरेशजी काशिद, उपाध्यक्ष नामदेव गांगुर्डे, सरचिटणीस रमेश गांगुर्डे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष रमेश जाधव, हरी मामा सोनवणे, समता सैनिक दलाचे स्वयंसेवक लक्ष्मण मगर, कार्याध्यक्ष किरण मोंढे, गणेश मोंढे, शिवाजी मोंढे, संजय मोंढे तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व शिरसगाव युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शिरसगावकरांना न्याय द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
