इगतपुरी — कर्होळे ग्रामपंचायतीचा मनमानी आणि अपारदर्शक कारभार उघड होत असून त्यामुळे गावाच्या विकासकामांना मोठा ब्रेक बसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामसभेच्या ठरावांकडे दुर्लक्ष करून बंद खोलीत निर्णय घेणे, विकासासाठी मंजूर निधीचा मनमानी पद्धतीने वापर, तसेच ग्रामस्थांकडून विचारणा केली तरी माहिती न देणे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे.
झाडे लावण्यासारख्या सार्वजनिक कामासाठी कोणतीही ग्रामसभा न घेता वैयक्तिक व्यक्तीच्या नावावर तब्बल ₹10,000 चा चेक दिल्याचा प्रकार विशेषतः वादग्रस्त ठरला आहे. गावाच्या निधीचा असा वापर पारदर्शकतेला मारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.ग्रामसेवक आणि सरपंच यांची गैरहजेरी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासह विविध शासकीय योजनांकडे झालेली पूर्णपणे दुर्लक्ष्यता यामुळे गाव विकासाच्या प्रवाहापासून मागे पडत आहे. इतर ग्रामपंचायतींमध्ये विकासकामे वेगाने सुरू असताना कर्होळे गावात मात्र कामकाज ठप्प असल्याचे चित्र दिसत आहे
.याबाबत ग्रामस्थांनी कडक भूमिका घेतली असून सर्व खर्चाचे तपशील जाहीर करणे, निर्णय ग्रामसभेत मांडणे आणि अनियमिततेची चौकशी करणे यांसारख्या मागण्या प्रशासनासमोर ठेवण्यात आलेल्या आहेत. नागरिकांचा स्पष्ट इशारा आहे की, ग्रामपंचायतीने लोकशाही पद्धतीने आणि पारदर्शक कारभार करूनच गावाच्या विकासाला गती द्यावी.
