रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मोफत रुग्णवाहिकेची तत्पर मदत; जखमीला नाशिकच्या रुग्णालयात दाखल
साक्ष न्यूज: मुंबई–आग्रा महामार्गावरील गोंदे फाटा परिसरात रेमंड कंपनीजवळ हरिओम धाब्याच्या नजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात एका दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एमएच १५ एफसी ६१६६ आणि एमएच ४६ डीजी ११४६ क्रमांकाच्या दोन दुचाकींची गोंदे रेमंड कंपनीजवळ एकमेकांना धडक बसली. या अपघातात महेश संपत मुसळे (वय २९, रा. नांदूरवैद्य, ता. इगतपुरी) हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या विनामूल्य रुग्णवाहिका सेवेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी महेश मुसळे यांना तत्काळ नाशिक येथील वृंदावन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यात तत्परता दाखवली.अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळावी यासाठी विनामूल्य रुग्णवाहिका सेवेने दाखवलेली तत्परता महत्त्वपूर्ण ठरली.
