साक्ष न्यूज: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर प्राचीन कुंभमेळा स्थळ असलेल्या चक्रतीर्थ, चाकोरे येथे धर्मध्वज स्तंभ उभारण्यात यावा, अशी मागणी श्रीराम शक्तिपीठ संस्थानाच्या वतीने करण्यात आली आहे. राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज (पंचायती अखाडा श्री निरंजनी) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानाने शासनाकडे ही मागणी केली असून, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. संस्थानाच्या निवेदनानुसार, चक्रतीर्थ हे प्राचीन काळापासून धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थळ आहे. येथे पूर्वी कुंभमेळा भरत असल्याचे तसेच शैव आणि वैष्णव परंपरांशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. २०१५-२०१६ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळातही स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या उपस्थितीत येथे धर्मध्वजारोहण सोहळा व धर्मस्नानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चक्रतीर्थ येथे धर्मध्वज स्तंभ उभारून या ऐतिहासिक स्थळाचे धार्मिक महत्त्व जपावे, अशी संस्थानाची भूमिका आहे.
धर्मध्वज स्तंभ उभारल्यास शैव आणि वैष्णव परंपरांमध्ये समन्वय साधण्यास मदत होईल तसेच भाविकांना या प्राचीन स्थळाचे दर्शन घेण्याची संधी मिळेल, असे संस्थानाने म्हटले आहे. या मागणीचा शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा स्थानिक धार्मिक व सामाजिक प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य आणि भाविकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल, असा इशारा श्रीराम शक्तिपीठ संस्थानाच्या वतीने देण्यात आला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चक्रतीर्थ येथील धर्मध्वज स्तंभाचा प्रश्न आता चर्चेत आला आहे.
