जमिनीच्या वादातून साळवे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी; दुडगावात खळबळ, त्र्यंबक पोलिसांत गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

(ता. त्र्यंबकेश्वर) :जमिनीच्या जुन्या वादातून दुडगाव येथील शेतकरी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दुडगाव येथील शेतकरी भाऊराव पांडू साळवे हे आपल्या शेतात मशागत करत असताना गावातील जयराम मते यांनी जुन्या जमिनीच्या वादातून त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. यावेळी भाऊराव साळवे यांचे लहान भाऊ संतोष साळवे यांनाही धमकावण्यात आल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, दुसऱ्या दिवशी जयराम मते हे २० ते २५ जणांना सोबत घेऊन आले आणि साळवे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीय भयभीत झाले आणि त्यांनी तातडीने त्र्यंबक पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तक्रारीची दखल घेत जयराम मते, त्यांचे भाऊ तसेच इतर संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ अंतर्गत कलम ३(१)(s) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम १८९, १८९(२), १९० आणि १९१(२) नुसार कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी शनिवारी दुपारी नाशिक विभागाचे डीवायएसपी यांच्यासह पोलिस पथकाने दुडगाव येथे भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच तक्रारदार भाऊराव साळवे यांना त्र्यंबक पोलीस ठाण्यात बोलावून जबाब नोंदविण्याची प्रक्रिया करण्यात आली.दरम्यान, दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले आहे. या घटनेमुळे दुडगाव परिसरात जमिनीच्या वादातून होणाऱ्या दबावाच्या प्रकारांवर चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »