साक्ष न्यूज : ग्राहक संरक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेच्या २६ व्या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्रातील नाशिकचे जिल्हाध्यक्ष दीपकजी भंगाळे यांना यंदाचा ‘उत्कृष्ट पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच जळगावचे जिल्हा सचिव रवींद्र अहिरे यांना ‘बेस्ट परफॉर्मन्स’ (उत्कृष्ट कामगिरी) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भोपाळ येथे झालेल्या या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना मिळालेल्या सन्मानामुळे ग्राहक संरक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेचे २६ वे राष्ट्रीय अधिवेशन मध्य प्रदेशातील भोपाळ येथील मानस भवन येथे ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिशंकर शुक्ल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या दोन दिवसीय अधिवेशनात देशभरातील विविध राज्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुशील कुमार पालो यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. न्यायमूर्ती अंजली पालो आणि मध्य प्रदेश शासनाचे माजी मंत्री पी. सी. शर्मा यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जितेंद्र ‘जीतू’ पटवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. आमदार रजनीश सिंह, माजी आमदार सुखेंद्र सिंह ‘बन्नाजी’, मध्य प्रदेश सेवा दलाचे मुख्य संघटक अवनीश भार्गव आणि संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस बाळासाहेब पांडे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण, जनजागृती आणि ग्राहक संरक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध राज्यांतील पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार निवडीसाठी ओम भारद्वाज यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीत अजय चौधरी, चितरंजन पर्वत, राजेंद्र सिंह बसवाल आणि शिवाकामी एस. यांचा समावेश होता. समितीच्या माध्यमातून विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली.
राज्यस्तरीय कामगिरीच्या गौरवात छत्तीसगड राज्याने प्रथम, पंजाबने द्वितीय, तर तमिळनाडूने तृतीय पुरस्कार पटकावला. याशिवाय विविध राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. महिला पदाधिकाऱ्यांमध्ये कटनी येथील प्रिती सेन यांना प्रथम, झारखंडच्या पुष्पा मिश्रा यांना द्वितीय, तर महाराष्ट्राच्या मंगला गरदे यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.या अधिवेशनातील महाराष्ट्रासाठी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नाशिकचे जिल्हाध्यक्ष दीपकजी भंगाळे यांना मिळालेला ‘उत्कृष्ट पुरस्कार’ आणि जळगावचे जिल्हा सचिव रवींद्र अहिरे यांना मिळालेला ‘बेस्ट परफॉर्मन्स’ पुरस्कार. या सन्मानामुळे ग्राहकांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि ग्राहक संरक्षणाच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या योगदानाला राष्ट्रीय व्यासपीठावर मान्यता मिळाली आहे.
