निफाडमध्ये संतापजनक घटना: 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीत एका तीन वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव तालुक्यातील सुमारे 32 कातकरी कुटुंबे निफाड तालुक्यातील मौजे चाटोरी येथे उसाच्या रसवंती (गुराळ) कामासाठी आली होती. दिनांक 1 मे 2026 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास, याच ठिकाणी काम करणाऱ्या एका मजूर महिलेच्या तीन वर्षांच्या मुलीवर त्याच गटातील समीर महाले नावाच्या व्यक्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे.

घटना प्रत्यक्ष मुलीच्या आईने पाहिल्यानंतर तिने मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र सुरुवातीला कोणीही मदतीला धावून आले नाही. त्यानंतर तिने आपल्या नात्यातील संदीप हीलम यांना फोनद्वारे संपर्क साधून संपूर्ण घटना सांगितली.संदीप हीलम यांनी ही माहिती श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी गोकुळ हीलम आणि संजय शिंदे यांना दिली. पुढे संजय शिंदे यांनी संघटनेचे राज्य सरचिटणीस विजय जाधव यांना घटनेची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनेचे पदाधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि सायखेडा पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना माहिती दिली.श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी भारतीय दंड संहिता (BNS 65(2)) तसेच पोस्को कायद्याच्या कलम 4(2) व 7 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, बालकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »