नाशिक-मुंबई महामार्गावरील इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब शिवारात रस्त्यालगत असलेली उघडी विहीर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. या विहिरीला तात्काळ मजबूत संरक्षक कठडा बांधण्यात यावा, अशी मागणी वृक्षप्रेमी व दारणा नदी सेवक बंटी पगारे यांनी केली आहे.सदर महामार्गावर २४ तास मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच धुक्याच्या वातावरणात वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण होते. अशा परिस्थितीत एखादे वाहन, दुचाकीस्वार किंवा पादचारी चुकून या उघड्या विहिरीत पडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अलीकडेच सोलापूर जिल्ह्यात अशाच प्रकारच्या दुर्घटनेतून गंभीर घटना घडल्याने रस्त्यालगतच्या उघड्या विहिरींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने माणिकखांब येथील विहिरीचे तातडीने सर्वेक्षण करून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मजबूत संरक्षक कठडा उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच इगतपुरी तालुक्यातील महामार्ग व इतर प्रमुख रस्त्यालगत असलेल्या सर्व उघड्या विहिरींचे सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून सामान्य नागरिकांचे जीवित सुरक्षित राहील, अशी अपेक्षा बंटी पगारे यांनी व्यक्त केली आहे.
