दुगारवाडी धबधब्यावर दुर्दैवी घटना; नाशिकरोडच्या २० वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध दुगारवाडी धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या नाशिकरोड (जेलरोड) येथील युवकांच्या ग्रुपवर गुरुवारी (दि. १६ जुलै) दुःखाचा डोंगर कोसळला. धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याने अभिजीत नवनाथ पवार (वय २०) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोड (जेलरोड) येथील १० जणांचा ग्रुप (७ युवक व ३ युवती) दुगारवाडी धबधब्यावर पर्यटनासाठी आला होता. दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास अभिजीत पवार हा धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात उतरला असता, पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने तो बुडाला.घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई कुणाल मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी धाडसाने पाण्यात उतरून अभिजीतला बाहेर काढले आणि त्याच्यावर सीपीआरद्वारे प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तातडीने त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, ही घटना प्रत्यक्ष डोळ्यांसमोर घडल्याने अभिजीतच्या मित्रांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यातील प्रणव खेरे, जय सोने आणि रितेश खेरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासन आणि वनविभागाने पर्यटकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात धबधबे, ओढे आणि नदीकाठावरील अनोळखी ठिकाणी किंवा पाण्याच्या खोली व प्रवाहाचा अंदाज नसलेल्या भागात उतरण्याचे टाळावे, तसेच स्वतःच्या आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »