काळू गांगुर्डे (साक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी) : नाशिक येथे २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात विविध महापुरुषांचा उल्लेख केला, मात्र भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव हेतुपुरस्सर टाळल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.या प्रकरणी त्र्यंबकेश्वर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, संविधानाचा अवमान करणाऱ्या या प्रकारावर संबंधित मंत्र्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमस्थळी आक्षेप घेतल्याने वनविभागातील दर्शना सौपूरे व माधुरी जाधव या महिला कर्मचाऱ्यांवर झालेल्या पोलिसी कारवाईचाही निषेध करण्यात आला.
संविधानाचा सन्मान राखण्यासाठी आवाज उठवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक आचारसंहिता लागू करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडी त्र्यंबकेश्वर तालुका व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित राहून घोषणाबाजी करत नासिक येथे रवाना झाले. नाशिक विश्रामगृह येथे माधुरी जाधव व दर्शना सौ पुरे यांची भेट घेतली त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे अरुण काशीद , सचिव रमेश गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते भागवत गांगुर्डे व त्र्यंबक तालुक्याचे प्रवक्ते सुरेश काशीद, मधुकर कडलक , पत्रकार काळू गांगुर्डे , तालुका संघटक नामदेव गांगुर्डे , प्रहार संघटनेचे नानासाहेब दोंदे , माजी जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ अंबापुरे , दीपक गांगुर्डे तसेच स्थानिक व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित राहून निषेध करण्यात आला
