डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर दिवंगत विपश्यनाच्या मृत्यूप्रकरणाची प्रशासनाकडून दखल; जिल्हा तज्ज्ञ समितीमार्फत उपचारांची तपासणी होणार

बातमी शेअर करा

१५ दिवसांत योग्य निर्णय न झाल्यास पीडित कुटुंबासह आमरण उपोषण; रिपाई नेते प्रकाश पगारे यांचा इशारा

साक्ष न्यूज : चार वर्षीय दिवंगत विपश्यना मिलिंद बनसोडे हिच्या मृत्यूप्रकरणी तिचे वडील मिलिंद बनसोडे यांनी शासनाकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून लेखी प्रतिसाद मिळाला आहे. संबंधित वैद्यकीय कागदपत्रे व तपासणी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले असून, जिल्हास्तरीय तज्ज्ञ समिती गठित करून उपचारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याबाबत पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे नेते आयु. प्रकाश पगारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दिवंगत विपश्यनाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. तसेच, येत्या १५ दिवसांत योग्य निर्णय न झाल्यास पीडित कुटुंबासह आमरण उपोषण आणि रिपाईच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

दिवंगत विपश्यना हिचा १४ सप्टेंबर २०२६ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिचे वडील मिलिंद बनसोडे यांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे सविस्तर तक्रार व निवेदन पाठविले होते. त्यामध्ये उपचारांचा संपूर्ण घटनाक्रम, आपत्कालीन परिस्थितीत देण्यात आलेला वैद्यकीय प्रतिसाद आणि नाशिक महानगरपालिकेच्या डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रात दिवंगत बालिकेवरील उपचारांची सर्व कागदपत्रे, तपासणी अहवाल आणि संबंधित वैद्यकीय नोंदी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, जिल्हास्तरीय तज्ज्ञ समिती गठित करून उपचारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील वैद्यकीय नोंदींच्या परीक्षणाकडे लक्ष लागले आहे.

तक्रारीनुसार, दिवंगत विपश्यना हिच्यावर ५ सप्टेंबर रोजी प्राथमिक उपचार आणि ११ सप्टेंबर रोजी पुनर्तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी तिची प्रकृती गंभीर झाली आणि त्याच दिवशी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. उपलब्ध वैद्यकीय अहवालांमध्ये डेंग्यू एनएस१ पॉझिटिव्ह आणि डेंग्यू आयजीएम प्रतिक्रियाशील असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर उपचारांच्या विविध टप्प्यांवर केलेले वैद्यकीय मूल्यांकन, आवश्यक तपासण्यांचा विचार, प्रकृती गंभीर झाल्यानंतर देण्यात आलेला सल्ला आणि पुढील उपचार यांची तज्ज्ञ समितीमार्फत तपासणी व्हावी, अशी कुटुंबीयांची मागणी आहे. उपचारांमध्ये वैद्यकीय मानकांनुसार आवश्यक ती काळजी घेण्यात आली होती का आणि काही त्रुटी आढळतात का, हे वस्तुनिष्ठ वैद्यकीय परीक्षणातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

या प्रकरणात पाथर्डी फाटा परिसरातील डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांचीही प्रशासकीय तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. परिसरातील डेंग्यू सर्वेक्षण, धूरफवारणी, अळीनाशक फवारणी, डासोत्पत्ती स्थळांची तपासणी आणि नागरिकांच्या तक्रारींवरील कार्यवाहीच्या नोंदींची पडताळणी करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या तपासणीत प्रत्यक्ष अंमलबजावणीची स्थिती स्पष्ट करून, काही त्रुटी किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधित यंत्रणेची जबाबदारी नियमानुसार निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून लेखी प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तज्ज्ञ समितीमार्फत होणाऱ्या कागदपत्रांच्या तपासणीकडे लक्ष लागले आहे. या परीक्षणातून वस्तुनिष्ठ निष्कर्ष समोर येऊन पुढील कार्यवाही पारदर्शकपणे व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

रिपाई नेते प्रकाश पगारे यांच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट :रिपब्लिकन पक्षाचे नेते (पगारे गट) प्रकाश पगारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिवंगत विपश्यना मृत्यूप्रकरणी निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली. तज्ज्ञ समितीच्या परीक्षणातून वैद्यकीय किंवा प्रशासकीय पातळीवरील कोणत्याही त्रुटी स्पष्ट झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई करावी, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली. तसेच, या दुःखद घटनेमुळे आर्थिक व मानसिक संकटाचा सामना करणाऱ्या पीडित कुटुंबाला नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्याबाबतही विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. सदर प्रकरणाची प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ चौकशीची प्रक्रिया सुरू करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. येत्या १५ दिवसांत या प्रकरणात योग्य निर्णय घेऊन ठोस कार्यवाही न झाल्यास पीडित कुटुंबासह आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा आयु. प्रकाश पगारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासनाला दिला. तसेच, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. या शिष्टमंडळात आयु. प्रकाश पगारे, संजय बाबा सानप, प्रवीण पगारे, ॲड. राहुल बनसोडे, किशोर गांगुर्डे, ॲड. सचिन अंभोरे आदी सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »