“जय भीम”चे प्रेरणास्थान न्यायमूर्ती के. चंद्रू नाशिकमध्ये; संविधानावर मार्गदर्शनाचा सुवर्णयोग! उपस्थित राहण्याचे ॲड. भारत बुकाने यांनी केले आवाहन

बातमी शेअर करा

नाशिक : सामाजिक न्यायाच्या लढ्यात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे, “जय भीम” चित्रपटाचे प्रेरणास्थान ठरलेले न्यायमूर्ती के. चंद्रू यांचे नाशिकमध्ये आगमन होत असून, नागरिकांसाठी ही एक प्रेरणादायी आणि ऐतिहासिक संधी ठरणार आहे.”जय भिम” या गाजलेल्या चित्रपटामागील खऱ्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारे न्यायमूर्ती चंद्रू हे मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अवघ्या आठ वर्षांत तब्बल ९६ हजार प्रकरणांचा वेगाने न्यायनिवाडा करत विक्रमी कामगिरी केली आहे.सामान्य नागरिक, कामगार आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारे न्यायमूर्ती चंद्रू यांनी न्यायालयीन प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता यावर विशेष भर दिला. मानवाधिकारांच्या प्रकरणांमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका आणि दिलेले निर्णय हे आजही मार्गदर्शक ठरत आहेत.

त्यांच्या साधेपण, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीमुळे ते न्यायव्यवस्थेतील एक आदर्श व्यक्तिमत्त्व मानले जातात. त्यांनी आपल्या प्रत्येक निर्णयात भारतीय संविधानातील समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे काटेकोर पालन केले आहे.नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे शुक्रवार, दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता न्यायमूर्ती चंद्रू यांचे संविधान विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.हा कार्यक्रम दरवर्षी वकील दिन म्हणून साजरा केला जात असून, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो. यंदा न्यायमूर्ती चंद्रू यांना प्रत्यक्ष ऐकण्याची आणि भेटण्याची संधी नाशिककरांना मिळत आहे.कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.या प्रेरणादायी कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक ॲड. भारत बुकाने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »