लेखक: मिलिंद सोनवणे (संपादक, साक्ष न्यूज)
आपण आधुनिक युगात जगतोय. तंत्रज्ञानाने आपले जीवन झपाट्याने बदलले आहे. ज्ञान, संवाद आणि माहितीच्या महासागरात आपण दिवस-रात्र पोहत आहोत. पण या प्रगत समाजात, जेव्हा आपण कोणाच्या चेहऱ्याकडे पाहतो, तेव्हा एक प्रश्न मनात येतो — हा खरा माणूस आहे का, की मुखवटा घातलेला एखादा अभिनेता? समाजात आज अशी अनेक माणसं दिसतात जी समाजसेवेच्या नावाखाली पुढे येतात, पण त्यांच्या कृती आणि हेतूंत विसंवाद असतो. या विसंवादाचं नाव आहे लाळचाटेपणा — सत्तेच्या, पैशाच्या किंवा प्रसिद्धीच्या मोहात माणुसकी गमावणं.
समाजाला नेहमीच दोन प्रकारचे लोक भेटतात — एक जे खऱ्या अर्थाने समाजासाठी जगतात, आणि दुसरे जे समाजाच्या नावाखाली स्वतःसाठी जगतात. पहिल्या गटात असे लोक असतात जे निष्कामपणे, बिनपगारी काम करत गावातल्या समस्यांकडे लक्ष देतात, न्याय मिळवतात आणि इतरांचंही भलं पाहतात. तर दुसऱ्या गटात ते आहेत जे समाजकार्याची पाटी लावतात, पण प्रत्यक्षात त्यांना रस असतो केवळ फोटो, पोस्ट आणि गाजावाजात. खरे समाजसेवक प्रसिद्धीच्या मागे नसतात; त्यांच्या कामांमधूनच त्यांची ओळख निर्माण होते. पण “लाळ चाटे” लोकांचे शब्द गोड असतात, वागणं भपकेबाज असतं आणि उद्देश स्वतःचा फायदा असतो.
आपल्या पूर्वजांच्या काळात माणुसकी, प्रामाणिकपणा आणि परस्पर सहकार्य ही समाजाची मुळे होती. आज मात्र स्पर्धा, ईर्ष्या आणि स्वार्थ या मुळे समाजाचे मूल्य हळूहळू गळून पडताना दिसतात. शेजाऱ्याचा आनंद पाहून आनंद होण्याऐवजी आता “त्याचं का? माझं नाही का?” अशी मानसिकता वाढते आहे. संवेदना हरवत आहेत. डिजिटल जगात “लाईक” आणि “शेअर” मिळवण्यात खऱ्या भावनांना जागाच उरलेली नाही. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार आहेत, पण माणुसकी टिकवण्यासाठी कोणी उभं राहत नाही.
आज अनेकजण समाजात नाव कमवण्यासाठी पुढे येतात, पण समाजसेवा ही फक्त फोटोशूट किंवा भाषणांमधून होत नाही. ती असते अडचणीतल्या माणसाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याची कला. पण “सेवक” या शब्दाचं रूपांतर “सेल्फी सेवक” मध्ये झालं आहे. गावात एखादं काम पूर्ण झालं की लगेच त्याचं श्रेय घेण्याची स्पर्धा लागते. माणूस “मी” म्हणण्यात इतका रमतो की “आपण” हे विसरतो.
समाजाला आज गरज आहे ती अशा व्यक्तींची, ज्या लाळचाटेपणातून बाहेर पडतील आणि सत्यव्रती माणुसकीकडे वळतील. खरे समाजकारण म्हणजे सत्तेसाठी नव्हे, तर समाजासाठी लढणं. सामान्य शिक्षक, डॉक्टर, शेतकरी, पत्रकार — यांपैकी कोणीही समाजात बदल घडवू शकतो, जर त्याने प्रामाणिकपणे काम केलं तर. प्रत्येकामध्ये काहीतरी देण्याची ताकद असते, फक्त ती योग्य दिशेने वापरायची गरज आहे. प्रसिद्धीच्या नशेमध्ये न पडता कामाची नशा जोपासणं हेच खरं मूल्य आहे.
बदल बाहेरून येत नाही; तो आपल्या मनातून उगवतो. आपण थोडं कमी बोललो आणि जास्त केलं, थोडं कमी दाखवलं आणि जास्त दिलं, थोडं कमी “मी” आणि थोडं अधिक “आपण” झालो, तर समाज पुन्हा उभारी घेईल. मुलांमध्ये प्रामाणिकता, करुणा आणि जबाबदारीची भावना वाढवणं ही खरी समाजसेवा ठरेल.आज समाजात मोठ्या मोठ्या भाषणांनी, वचनांनी किंवा घोषणांनी नाही — तर छोट्या कृतींनी परिवर्तन होणार आहे. एखाद्या वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडायला मदत करणं, एखाद्या विद्यार्थ्याला पुस्तक देणं, एखाद्या शेतकऱ्याच्या समस्येची बातमी प्रामाणिकपणे मांडणं — हीच खरी सेवा आहे. सत्तेच्या किंवा प्रसिद्धीच्या मोहात पडून जी मंडळी “लाळ चाटतात”, त्यांना समाज लवकरच ओळखतो. पण जे मूकपणे काम करतात, त्यांना इतिहास लक्षात ठेवतो. कारण शेवटी समाजाला फक्त नेते नकोत — त्यांना माणूसपण जपणारे माणूस हवेत.

Apratim…