इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी घटना घडली आहे. गावातील पहिली पोलीस कन्या म्हणून कु. नम्रता अल्का विष्णू सोनवणे हिची मुंबई पोलीस दलात निवड झाली. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व ग्रामस्थ, सम्राट सोशल ग्रुप नांदडगाव आणि सोनवणे परिवाराच्या वतीने भव्य कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संपूर्ण गावातून नम्रताची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी फुलांचा वर्षाव करत तिच्या यशाचे कौतुक केले. कार्यक्रमस्थळी उपस्थितांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.नम्रताच्या यशामागचा संघर्षही प्रेरणादायी आहे. कोरोना काळात वडिलांचे निधन झाल्यानंतर तिचे चुलते श्री. गणेश सोनवणे यांनी वडिलांची भूमिका निभावत तिला भक्कम साथ दिली. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी तिला सातत्याने प्रोत्साहन दिले.
इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळू न शकल्याने नम्रताने निराश न होता नव्या ध्येयाने पुढील वाटचाल सुरू केली. प्रतिकूल परिस्थिती, अडचणी आणि संघर्ष यांना सामोरे जात तिने पोलिस भरतीची तयारी सुरू ठेवली. उंचीची अडचण असतानाही तिने हार न मानता मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अखेर मुंबई पोलीस दलात स्थान मिळवले.या यशामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या ज्ञानदा करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष श्री. शेळके सर यांचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग मिळत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.कार्यक्रमाला ज्ञानदा करिअर अकॅडमीचे विद्यार्थी, नातेवाईक, सोनवणे परिवार, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ तसेच सम्राट सोशल ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नम्रता सोनवणे हिच्या यशाने नांदडगावमधील तरुण-तरुणींना प्रेरणा मिळाली असून, “जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही” हा संदेश या सोहळ्यातून मिळाला.
