घोटी–त्र्यंबक रस्ता मोजणीदरम्यान तणाव; शेतकऱ्यांचा विरोध कायम, 22 दिवसांपासून अहुर्ली येथे उपोषण

बातमी शेअर करा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे शिवारात घोटी–त्र्यंबक रस्त्याच्या मोजणीदरम्यान शुक्रवारी (दि. ५) तणाव निर्माण झाला. प्रशासनाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात मोजणी पूर्ण केली असून, या कारवाईस शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. मोजणीला अडथळा आणणाऱ्या काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. नंतर त्यांना सोडण्यात आले.

सकाळपासूनच शासन यंत्रणा मोजणीसाठी उपस्थित झाली होती. यावेळी 100 पेक्षा अधिक पोलिस आणि SRPF जवान बंदोबस्तासाठी तैनात होते. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, हरिभाऊ अंबापुरे, भाऊराव डगळे, संतोष अंबापुरे यांच्यासह सुमारे 20 आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत मोजणीला विरोध दर्शविला.घोटी–त्र्यंबक रस्त्यासाठी दोन्ही बाजूंनी 22.5 मीटर जमिनीची मोजणी करण्यात आली असून, वळणांवर 45 मीटर पर्यंत जमीन घेण्यात येणार आहे. ही रस्त्याची रुंदी अतिशय जास्त असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 साठी भूसंपादनाविरोधात घोटी परिसरातील शेतकरी मागील 22 दिवसांपासून अहुर्ली येथे साखळी उपोषण करत आहेत. शुक्रवारी प्रशासनाने भूसंपादनाची मोजणी करण्याचा प्रयत्न केला असता उपोषणकर्त्यांनी विरोध दर्शविला. काही शेतकऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र नंतर त्यांना सोडण्यात आले.

उपोषणकर्त्यांमध्ये कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव उमेश खातळे, सचिव गोरख वाजे, उपाध्यक्ष विवेक कुटके, किसन गायकर तसेच स्थानिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. आहुर्ली परिसरात शेतकऱ्यांनी काहीकाळ ठिय्या आंदोलनही केले. दडपशाही करून जमीन घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »