जिल्हा परिषद नाशिक, आरोग्य विभाग, सामाजिक कल्याण विभाग आणि जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी उपयुक्त असे तपासणी व नोंदणी शिबिर दिंडोरी आणि वणी येथे घेण्यात आले. जिल्ह्यातील दिव्यांगांना सरकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा आणि UDID कार्ड वाटपाची प्रक्रिया वेगवान व्हावी या उद्देशाने हा पायलट प्रकल्प राबविण्यात आला.या उपक्रमामागील संकल्पना जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची असून, या उपक्रमामुळे दिव्यांग प्रमाणपत्र मिळविताना होणारी हेळसांड कमी होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद नाशिक यांच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात सुमारे १७ ते १७.५ हजार दिव्यांग व्यक्ती असून, त्यांचे वयगटानुसार वर्गीकरण करून तपासणी व प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ करण्याचे उद्दिष्ट आहे.दिंडोरी येथील शिबिरात ३७१ तर वणी येथे सुमारे २०० दिव्यांगांची तपासणी करण्यात आली. या शिबिरांत अंधत्व, कर्णबधिरता, बौद्धिक अक्षमता, शारीरिक विकृती, मानसिक विकार आदी विविध दिव्यांगांची तपासणी, नोंदणी आणि UDID कार्ड वाटप करण्यात आले.
या शिबिरामुळे दिव्यांगांना प्रवास सवलत, निवृत्तीवेतन, नोकरीतील प्राधान्य, घरकुल योजना, आरोग्य सुविधा आदी अनेक योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.या उपक्रमात जिल्हा आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी, आशा व अंगणवाडी सेविका, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, डाटा एन्ट्री ऑपरेटर्स आदींचे सहकार्य लाभले.
हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर भागात तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांतही हा उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

