इगतपुरी तालुक्यातील मुरंबी परिसरातील वीटभट्टीवर घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोशेरा (ता. मोखाडा, जि. पालघर) येथून कामासाठी आणलेल्या 12 कातकरी मजूर कुटुंबांवर अमानुष अत्याचार होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, श्रमजीवी संघटनेने वेळेत हस्तक्षेप करत पीडितांना न्याय मिळवून दिला आहे.
दीड महिन्यापूर्वी वीट तयार करण्यासाठी उचल (बयाना) देऊन मजुरांना मुरंबी येथील वीटभट्टी मालक संदीप शिंदे यांच्याकडे आणण्यात आले होते. याठिकाणी मजुरांकडून अल्प मोबदल्यात जबरदस्तीने अधिक काम करून घेतले जात होते. गंभीर बाब म्हणजे एका आदिवासी महिलेवर तिच्या पतीसमोर नाही असताना अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.या घटनेची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन वाडीवरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आरोपी संदीप शिंदे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 64(1), 351(2) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत गंभीर कलमे लावण्यात आली.
तसेच मजुरांना जबरदस्तीने कामास ठेवून वेठबिगारीप्रमाणे वागणूक दिल्याने बंधमजुरी (वेठबिगार) कायदा 1976 अंतर्गत कलम 16, 17, 18 लावण्यास पोलिसांना भाग पाडण्यात श्रमजीवी संघटनेला यश आले.नाशिक येथील DYSP हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक मथुरे व पोलीस पथकाने घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. पीडित कुटुंबांना दिलासा मिळाल्याने श्रमजीवी संघटनेच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.ही कारवाई विवेकभाऊ पंडित व विजयभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमजीवी संघटनेच्या नाशिक व इगतपुरी कार्यकर्त्यांनी केली.हा प्रकार ग्रामीण भागात चालणाऱ्या मजूर शोषणावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
