इगतपुरी : ऑनलाईन फार्मसी आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या कथित धोरणांविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी मंगळवारी (दि. २० मे) एकदिवसीय देशव्यापी बंद पुकारला. या बंदला इगतपुरी तालुक्यातही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरासह तालुक्यातील बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती.ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या आवाहनानुसार हा बंद करण्यात आला. ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक औषध व्यवसायावर मोठा परिणाम होत असून, नियमांचे उल्लंघन करून औषधांची विक्री केली जात असल्याचा आरोप औषध विक्रेत्यांनी केला आहे. तसेच कॉर्पोरेट कंपन्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे छोट्या मेडिकल व्यावसायिकांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची भावना विक्रेत्यांनी व्यक्त केली.इगतपुरी शहरातील मुख्य बाजारपेठेसह घोटी, कसारा आणि ग्रामीण भागातील अनेक मेडिकल दुकाने बंद असल्यामुळे नागरिकांना औषधे खरेदीसाठी अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः नियमित औषधे घेणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि आपत्कालीन गरज असलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. काही रुग्णालयांशी संलग्न मेडिकल दुकाने अत्यावश्यक सेवा म्हणून मर्यादित वेळ सुरू ठेवण्यात आली होती.
औषध विक्रेत्यांनी शासनाकडे ऑनलाईन फार्मसीसाठी कठोर नियमावली लागू करण्याची मागणी केली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता महत्त्वाची असल्याने अनियंत्रित ऑनलाईन विक्रीवर निर्बंध आणावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.दरम्यान, इगतपुरीतील औषध विक्रेत्यांनी शांततेत बंद पाळत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.
