त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी मंदिर परिसरातील सुरक्षा रक्षकांनी गैरवर्तन केल्याचा आरोप असून एका भाविकाला गंभीर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. हजारो भाविक तासन्तास रांगेत उभे राहून दर्शनासाठी प्रतीक्षा करत आहेत. याचदरम्यान दर्शन रांगेतील नियोजनावरून एका भाविकाचा आणि सुरक्षा रक्षकांचा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.हा वाद इतका वाढला की काही सुरक्षा रक्षकांनी संतापाच्या भरात त्या भाविकाला ओढत नेत त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या मारहाणीमध्ये संबंधित भाविकाचे कपडेही फाटल्याचे दिसून येत असून मंदिराच्या पवित्र परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, यापूर्वीही मंदिर परिसरात भाविकांशी सुरक्षा रक्षकांकडून गैरवर्तन झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे या घटनेमुळे मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. श्रद्धेने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अशा प्रकारे मारहाण होणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत भाविकांकडून व्यक्त केले जात आहे.या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी सुरक्षा रक्षकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मात्र या घटनेबाबत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
