त्र्यंबकेश्वर येथे महापरिनिर्वाण दिन संपन्न; वंचित आघाडीची संघटनात्मक तयारी युद्धपातळीवर

बातमी शेअर करा

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अरुण भाऊ काशीद यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अतिशय खेळीमेळीच्या व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमास महिला तालुका अध्यक्ष विमलताई यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तालुका अध्यक्ष अरुण भाऊ काशीद यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गटप्रमुख, गणप्रमुख व बूथ प्रमुखांची जबाबदारी निश्चित करत संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.

तसेच, “येत्या निवडणुकांमध्ये आपल्या उमेदवारांचा बहुमताने विजय व्हावा यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तन-मन-धनाने काम करावे,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. कार्यकर्त्यांनी उमेदवारांना पूर्ण ताकदीने पाठिंबा देण्याची जबाबदारी स्विकारली.या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे संपर्कप्रमुख काळु गांगुर्डे यांची विशेष उपस्थिती होती.

भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.कार्यक्रमानिमित्त बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक न्याय व बहुजनांच्या हक्कांसाठी संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »