आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे दर्शन पथ विकसित करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय स्थलांतरित होण्याची शक्यता अधिकच बळावली आहे. मंदिर दर्शन पथासाठी रस्ता रुंदीकरण व मोकळी जागा उपलब्ध करून देण्याच्या नियोजनात उपजिल्हा रुग्णालयाची सध्याची इमारत पाडली जाण्याचीही चर्चा आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये आणि ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
जर उपजिल्हा रुग्णालय हलवणे अपरिहार्य असेल, तर ते त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या मालकीच्या अमृतकुंभ धर्मशाळेतच सुरू करावे, अशी ठाम मागणी परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत आहे. ही धर्मशाळा आंबेडकर चौकातच असल्याने रुग्णालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच राहील आणि नागरिकांची गैरसोय टळेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय हे आंबेडकर चौक परिसरात असून शहरातील तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेसाठी हे रुग्णालय आरोग्यसेवेचे मोठे वरदान ठरले आहे. यापूर्वीही रुग्णालय स्थलांतरास विरोध करत ‘रुग्णालय हलवू नये’ अशी जोरदार मागणी झाली होती; मात्र आता पुन्हा ही चर्चा सुरू झाल्याने आंदोलनाची शक्यताही व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वरपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या तळवाडे त्रंबक येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या इमारतीत हे उपजिल्हा रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर हलवण्याचा प्रस्ताव समोर आहे. मात्र तळवाडे हे अंतर ग्रामीण रुग्णांसाठी खर्चिक व वेळखाऊ ठरणार असल्याने या प्रस्तावाला नागरिकांचा तीव्र विरोध आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे, सन 1991-92 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली होती. त्याआधी प्राथमिक आरोग्य केंद्र सध्याच्या पंचायत समितीच्या इमारतीत कार्यरत होते.
आता 2026 च्या सिंहस्थासाठी पुन्हा एकदा रुग्णालय स्थलांतराचा विषय पुढे आल्याने इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याची भावना नागरिकांत आहे.दरम्यान, सुमारे 68 कोटी रुपये खर्चून दर्शन पथ विकसित करण्याचे नियोजन असून, कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक येणार असल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मोकळी जागा निर्माण केली जाणार आहे. मात्र, भाविकांच्या सोयीसोबतच स्थानिक जनतेच्या आरोग्यसेवेचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व कुंभमेळा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून, रुग्णालय स्थलांतराबाबत सर्वसमावेशक व जनहिताचा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी त्र्यंबकेश्वरकरांकडून होत आहे.
