आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी कांचनगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) वतीने बस सेवा सुरू करण्यात आली. या बस सेवेचा छोटेखानी पण अर्थपूर्ण शुभारंभ गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.या प्रसंगी कांचनगाव ग्रामस्थांच्या वतीने बस चालक व वाहक कर्मचाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शिक्षणात होणारे नुकसान टाळण्यासाठी ही बस सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
ग्रामीण भागातील अनेक पालकांसाठी, विशेषतः मुलगी शिक्षणासाठी गावाबाहेर जात असताना, ती सुखरूप शाळेत पोहोचेल का आणि परत येईल का, ही कायमची चिंता असते. त्यातच मागील काही दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भीतीमुळे शाळेतील मुला-मुली शेवटचा तास न करता लवकर घरी निघून जात होते, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन शिक्षणावर होत होता.विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी सातत्याने पाठपुरावा करून बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या उल्लेखनीय कार्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत संबंधित कार्यकर्त्याचा शाल व पुष्प देऊन जाहीर सत्कार केला.
ही बस सेवा उपलब्ध होण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय राजाभाऊ वाजे,ग्रामपंचायत सदस्य संघर्ष संघटना, इगतपुरी तालुका,तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, इगतपुरी येथील अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.या बस सेवेच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांना सुरक्षित, नियमित आणि संपूर्ण वेळेचे शिक्षण घेणे शक्य होणार असून, पालकांमध्येही मोठ्या प्रमाणावर समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
