जिल्हाधिकारी कार्यालयात घोटी ते त्र्यंबकेश्वर मार्गावरील भूसंपादन प्रकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. माननीय जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या बैठकीस भूसंपादन उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, माननीय खासदार राजाभाऊ वाजे, माननीय आमदार हिरामण खोसकर, तसेच घोटी ते त्र्यंबकेश्वर भूसंपादित शेतकरी कृती समितीचे पदाधिकारी व सर्व भूसंपादित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत भूसंपादन प्रक्रियेदरम्यान उद्भवलेल्या अडीअडचणी, भरपाईचे प्रश्न, मोजणीतील तफावत, कागदपत्रांची पूर्तता, तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकरी प्रतिनिधींनी आपली भूमिका ठामपणे मांडत न्याय्य मोबदला व प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची मागणी केली.
माननीय जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देत प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली. तसेच प्रशासन व शेतकरी यांच्यात समन्वय ठेवून मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले.खासदार व आमदार यांनी देखील शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही देत प्रशासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.या बैठकीमुळे भूसंपादन प्रश्नावर सकारात्मक पाऊल उचलले गेले असून, शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काळात प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
