त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तब्बल 85 ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली असून मागील तीन महिन्यांपासून त्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन मिळालेले नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक ग्रामरोजगार सेवक कार्यरत असूनही मानधन रखडल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे.सदर ग्रामरोजगार सेवकांकडून पंचायत समिती स्तरावर विविध कामांची मागणी केली जात असली, तरी प्रत्यक्षात मानधन न दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामरोजगार सेवकांनी एकत्र येत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने थकीत मानधन जमा करण्याची मागणी केली.
होळीचा सण ऐन तोंडावर असताना तीन महिन्यांचे मानधन थकवणे अन्यायकारक असल्याचे ग्रामरोजगार सेवकांचे म्हणणे आहे. “मानधन तात्काळ जमा न झाल्यास काम बंद करण्याचा इशारा देण्यात येईल,” असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना तुकाराम देशमुख, रघुनाथ बेंडकोळी, सुरेश फुफाने, अमोल जाधव, विलास जाधव, सागर लचके, दत्तू गवळी, पोपट भोये, विठ्ठल महाले, काळू बेंडकोळी, प्रकाश महाले, तुळशीराम भाऊ घाटाळ आदी ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
