त्र्यंबकेश्वरमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते सत्कार; सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ₹१४०० कोटींच्या विकासकामांचा आराखडा सादर

बातमी शेअर करा

काळू गांगुर्डे, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार सोहळा आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या शुभहस्ते पार पडला. या प्रसंगी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरातील विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा व सादरीकरण करण्यात आले.आज कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले होते. तातडीच्या स्वरूपात नगरसेवक व नगरपालिका अधिकाऱ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून सर्व नगरसेवकांना नगरपालिकेत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या सत्कार सोहळ्याला कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, प्रांताधिकारी, तहसीलदार, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसेच उपस्थित प्रत्येक नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर परिसरात सुमारे ₹१४०० कोटींची विकासकामे शासन स्तरावर प्रस्तावित असून, ही कामे केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित न राहता शहराच्या कायमस्वरूपी विकासासाठी असणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, दर्शन पथ, नागरी सुविधा यांसारख्या विविध विकासकामांचा समावेश या आराखड्यात आहे.

यावेळी मुख्य विकासकामांचे संकल्पचित्रे (डिझाईन्स) पडद्यावर दाखवून नगरसेवकांना सविस्तर माहिती देण्यात आली. भविष्यातील गरजा लक्षात घेता काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतील, मात्र त्या निर्णयांना नगरसेवकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक लवकरच अधिकृतपणे कारभार हाती घेणार असून, त्याआधीच प्रशासनाकडून विकासाची दिशा स्पष्ट करण्यात आल्याने हा सत्कार सोहळा पुढील जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरला.या वेळी नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार (सौ. सोनवणे) यांनी प्रशासनाचे आभार मानत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »