त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी : त्र्यंबक नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील संत चोखामहार मंदिरासमोरील समस्त महार चोखामेळा वहिवाटदार ट्रस्टच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवून देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी निवास, स्नानगृह, शौचालय, सभामंडप व पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभाराव्यात, अशी मागणी भक्तगणांनी जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.भक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबक नगरपरिषदेच्या हद्दीत गट क्रमांक ६३२ व शिट क्रमांक १० ही जागा समस्त महार चोखामेळा वहिवाटदार ट्रस्टच्या मालकीची आहे. या ठिकाणी संत चोखामहार यांची समाधी असून, पांडुरंग निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरासमोरच हे पवित्र स्थान आहे. परंपरेनुसार भाविक प्रथम संत चोखामहार यांचे दर्शन घेऊन त्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन घेतात.दर महिन्याच्या एकादशीला तसेच विविध वारी व धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी मोठ्या प्रमाणावर भाविक येथे येतात. मात्र, या ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे भाविकांना उघड्यावर ऊन, वारा आणि पावसात मुक्काम करावा लागत आहे. यामुळे भक्तांची मोठी गैरसोय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
या संदर्भात ३ ऑक्टोबर २०२५ रोजी त्र्यंबक नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना अतिक्रमण हटवून सुविधा उभारण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी नाराजी भक्तगणांनी व्यक्त केली.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून लाखो भाविक त्र्यंबकेश्वर येथे येणार असल्याने संत चोखामहार ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण हटवून निवासस्थान, स्नानगृह, शौचालय, सभामंडप आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्यासाठी सिंहस्थ निधीतून तरतूद करण्यात यावी, तसेच यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आराखडा तयार करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच, १८ जानेवारी १९२७ रोजी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी भेट दिली होती. मात्र, आजपर्यंत मंदिराचा जीर्णोद्धार झालेला नसल्याची बाबही निवेदनातून मांडण्यात आली आहे.निवेदन देताना संत चोखोबा भक्तगण व सामाजिक कार्यकर्ते नाना कारभारी सोनकांबळे, काळू अर्जुन गांगुर्डे, गौतम पगारे, बाळासाहेब सोनवणे, भाऊराव सावळेराम डोळस, दादू भाऊराव साळवे, रघुनाथ विठ्ठल गांगुर्डे, सुरेश कृष्णा दोंदे आदी उपस्थित होते.

