त्र्यंबकेश्वरमध्ये बायोगॅस क्रांती! १५० आदिवासी कुटुंबांना स्वच्छ व स्वस्त इंधनाचा दिलासा

बातमी शेअर करा

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्रामीण भागासाठी राबविण्यात आलेला बायोगॅस उपक्रम यशस्वी ठरत असून स्थानिक कुटुंबांसाठी तो आशेचा किरण बनला आहे. स्वयंशिक्षण प्रयोग आणि Mankind Pharma यांच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत तब्बल १५० बायोगॅस प्लांट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे १५० कुटुंबांना थेट लाभ मिळत आहे.या उपक्रमामुळे गरीब व आदिवासी कुटुंबांना घरगुती स्वयंपाकासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक इंधन सहज उपलब्ध झाले आहे. परिणामी एलपीजी गॅसवरील खर्चात मोठी बचत होत असून कुटुंबांचा आर्थिक भार हलका झाला आहे.

पहिने, सामुंडी, अश्वलीहर्ष, झारवड खुर्द, टाकेहर्ष, आव्हाटे, मेटचंद्राची, हुंबाचीमेट, कळमुस्ते आणि सापगाव या १० गावांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला आहे. गावांमध्ये उपलब्ध जनावरांच्या शेणाचा वापर करून तयार होणाऱ्या बायोगॅसमुळे इंधनाचा शाश्वत स्रोत निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे, बायोगॅस प्लांटमधून मिळणारे सेंद्रिय खत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून त्यामुळे शेती उत्पादनातही सकारात्मक बदल दिसून येत आहेत. त्यामुळे हा उपक्रम केवळ इंधनापुरता मर्यादित न राहता शेती विकासालाही चालना देत आहे.सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत आखाती देशांमधील तणावामुळे पेट्रोल, डिझेल व एलपीजी दरवाढीची शक्यता व्यक्त होत असताना, या बायोगॅस प्रकल्पांनी ग्रामीण व आदिवासी कुटुंबांसाठी परवडणारा आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे.पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि आर्थिक सशक्तीकरण या तिन्ही उद्दिष्टांना पूरक ठरणाऱ्या या उपक्रमाबद्दल लाभार्थी कुटुंबांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम अधिकाधिक आदिवासी भागात राबविण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »