नाशिक – वडाळा गाव परिसरातील रहिमतनगर, इंदिरानगर, वडगाव येथील गल्ली क्रमांक 4 मधील रस्त्याची अत्यंत खराब अवस्था लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी महापौर व स्थायी समिती सभापती यांना निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे रस्त्याची तातडीने दुरुस्ती व नव्याने बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली.महापौरांच्या कार्यालयात झालेल्या भेटीत नागरिकांनी रस्त्याच्या समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल, खड्डे आणि पाण्याचे साचलेले डबके यामुळे रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी महापौरांनी नागरिकांच्या मागणीची दखल घेत लवकरात लवकर संबंधित विभागाकडून पाहणी करून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन दिले.
या प्रसंगी समाजसेवक जावेद शेख (जावेद भाऊ शेख) यांच्यासह फयेज शरीफ पटेल, चांद शेख, उस्मान शेख, सलमान काझी, जमील शेख, सलमान आदी नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी केली.स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे यावेळी महापौरांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे.आता महापालिकेकडून यावर किती लवकर कार्यवाही होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
