कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या पाईपलाईन कामांवर प्रश्नचिन्ह ; तुटलेल्या पाईपचा वापर करून नागरिकांच्या जीवाशी खेळ ?

बातमी शेअर करा

नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याची मोठ्या प्रमाणावर कामे करत आहे. मात्र काही ठिकाणी सुरू असलेल्या कामांमध्ये गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचे समोर आले आहे. कॉन्ट्रॅक्टदारांकडून तुटलेल्या, फुटलेल्या तसेच निकृष्ट दर्जाच्या पाईपचा वापर करण्यात येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले असून त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर पाणीगळती, रस्त्यावर चिखल, गटारसदृश परिस्थिती आणि अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाईपलाईन टाकताना अनेक ठिकाणी आधीच क्रॅक झालेले आणि कडा तुटलेले पाईप जमिनीत बसवले जात आहेत. अशा पाईपमधून भविष्यात पाणी लिकेज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी लाखो लिटर पाणी वाया जाण्याबरोबरच रस्त्यावर कायम चिखल निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो.

विशेष म्हणजे कुंभमेळ्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील धार्मिक सोहळ्याच्या तयारीदरम्यान अशी निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याने महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना काही ठेकेदार मात्र फक्त आर्थिक फायदा मिळवण्यासाठी दर्जाहीन कामे करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.नागरिकांनी महानगरपालिका प्रशासन, संबंधित अभियंते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी कॉन्ट्रॅक्टदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच ज्या ठिकाणी निकृष्ट किंवा तुटलेले पाईप वापरण्यात आले आहेत, ते त्वरित बदलून दर्जेदार साहित्याचा वापर करावा, अशीही मागणी करण्यात येत आहे.कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामे पारदर्शक, सुरक्षित आणि दर्जेदार होणे आवश्यक असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »