रमाई गौरव पुरस्कार २०२६ ने कल्पनाताई दिवेकर यांचा सन्मान; घोटी शहरासाठी अभिमानाचा क्षण

बातमी शेअर करा

भारतीय बौद्ध महासभा शाखा घोटी शहर महिला कार्यकारिणीच्या संस्कार सचिव कल्पनाताई गोपाळ दिवेकर यांना महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्य आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल “रमाई गौरव पुरस्कार २०२६” प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार २७ मे २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला चळवळीचे मासिक “रमाई” यांच्या १२ व्या साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला.रमाई फाउंडेशन, रमाई प्रकाशन आणि रमाई मासिक, संभाजीनगर (औरंगाबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भव्य सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमाताई आंबेडकर (तेलतुंबडे) तसेच संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या हस्ते कल्पनाताई दिवेकर यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कल्पनाताई दिवेकर यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या या यशामुळे घोटी शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि बौद्ध संघटनांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.भारतीय बौद्ध महासभा शाखा घोटी शहर महिला व पुरुष कार्यकारिणीच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »