सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची त्र्यंबकेश्वरला भेट; कामांचा घेतला आढावा. कुंभमेळा प्रशासन व नगरपालिका यांच्यात समन्वय साधण्यावर भर

बातमी शेअर करा

साक्ष न्यूज : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथे भेट देत विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी तीर्थराज कुशावर्त परिसरातील सुरू असलेल्या कामांची तसेच पुरातत्त्व विभागाशी संबंधित कामांची माहिती त्यांनी जाणून घेतली.जिल्हाधिकाऱ्यांनी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचाही आढावा घेतला. बडा उदासीन आखाडा, आनंद आखाडा यासह विविध ठिकाणी भेट देऊन संबंधित कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.

या भेटीदरम्यान त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद आणि कुंभमेळा प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय राहावा, यावर विशेष भर दिला जात असल्याचे दिसून आले.नाशिक येथे नुकत्याच झालेल्या मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत नगरपरिषदेचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नियोजनात प्रशासन आणि नगरपालिका यांच्यात समन्वयाची भूमिका अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे. आगामी काळात त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळा संबंधित कामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »