नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी रेल्वेने एक आनंददायक निर्णय घेतला आहे. नाशिकहून मुंबईचा रेल्वे प्रवास नेहमीच खडतर राहिला आहे. नाशिकहून थेट मुंबईसाठी असलेल्या रेल्वेगाडीच्या अभावामुळे आधीच प्रवाशांनी गच्च भरुन येणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्येच नाशिकच्या प्रवाशांना चढावे लागते. त्यातच दादरच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसआधीच्या रेल्वे स्थानकांवर कामानिमित्त उतरणाऱ्यांचे अधिक हाल होतात. कारण, लांब पल्ल्याच्या गाड्या बऱ्याच रेल्वे स्थानकांमध्ये थांबत नाहीत. त्यामुळे नाशिकच्या प्रवाशांकडून सातत्याने नासिकहून कसाऱ्यापर्यंत लोकलसेवा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीला पूरक असा निर्णय रेल्वेने अखेर घेतला आहे.
मनमाड–कसारा आणि कसारा–मुंबई या सुमारे १३१ किलोमीटरच्या मार्गांवर दोन नवीन रेल्वेमार्गिका तयार करण्यास रेल्वे प्रशासनाने औपचारिक मंजुरी दिली आहे. यामुळे नाशिक-कसारा लोकल सेवा सुरु करण्यात यावी, ही नाशिककरांची प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागणी पूर्णत्वाच्या दिशेने एक पाऊल पडले आहे
.नाशिक-कसारा रेल्वेमार्ग हा नाशिकहून मुंबईसाठी दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. नाशिक-कसारा दरम्यान दोन नवीन रेल्वेमार्गिका टाकण्यास मंजुरी मिळाल्याने नाशिकहून कसारा आणि कसाऱ्याहून मुंबई किंवा थेट नाशिकहून मुंबई अशी लोकल सेवा सुरु होऊ शकेल. आतापर्यंतच्या चाचणीत कसारा घाट हा लोकल सेवेसाठी अडचणीचा ठरत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात येत होते. परंतु, या निर्णयामुळे त्यावरही पर्याय शोधण्यात आला असेल.
नाशिक-कसारा रेल्वेमार्ग झाल्यास पाडळी, वैतरणानगर, चिंचलेखैरे अशी नवीन रेल्वे स्थानके तयार होण्याची शक्यता आहे. कसारा-इगतपुरीदरम्यानच्या कामासाठी निधीही मंजूर झाला आहे.सद्यस्थितीत मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गिकेवर रेल्वेगाड्यांची अतिशय वर्दळ आहे. त्यामुळे अनेक गाड्यांना दुसऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना मार्ग करुन देण्यासाठी कुठल्यातरी रेल्वे स्थानकात काहीवेळ बाजूला थांबून राहावे लागते. त्यातच मालगाड्यांची भर पडत असते. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे मनमाड–कसारा आणि कसारा–मुंबई या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या दोन स्वतंत्र रेल्वेमार्गिका उभारण्याची मागणी लावून धरली होती. त्यासाठी सतत पाठपुरावाही त्यांच्याकडून सुरु होता.
रेल्वे मंत्रालयाने दोन्ही मार्गांवर नवीन दुहेरी मार्गिका उभारण्यास मंजुरी दिल्याने खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. या निर्णयामुळे नाशिक-मुंबई प्रवास अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे. नवीन रेल्वेमार्गिकांना मंजुरी मिळाली असली तरी प्रकल्पाची अंमलबजावणी होणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपल्याकडून यापुढेही सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. नवीन रेल्वेमार्गिकांसाठी होणाऱ्या भूसंपादनात शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, त्यांना योग्य तो मोबदला मिळावा, यासाठी आपली भूमिका राहील, असे खासदार वाजे यांनी नमूद केले आहे.
