सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह महिरावणीत हलविण्यास तीव्र विरोध; त्र्यंबकेश्वर मध्ये ठेवण्याची मागणी, आंदोलनाचा इशारा-महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे

बातमी शेअर करा

त्र्यंबकेश्वर येथे गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेले सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह महिरावणी येथे स्थलांतरित करण्याच्या हालचालींना विद्यार्थिनी, पालक आणि विविध सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. समाजकल्याण विभागाकडून वसतिगृह महिरावणी येथे हलविण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.या वसतिगृहात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक मुली शिक्षण घेत आहेत. विद्यार्थिनींच्या शैक्षणिक सोयीसाठी वसतिगृह त्र्यंबकेश्वर शहरातच कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. स्थानिक स्तरावर पर्यायी जागांचे पर्याय समाजकल्याण विभागाला दाखविण्यात आले असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मात्र, त्या जागांना विभागाकडून मान्यता मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

वसतिगृह महिरावणी येथे स्थलांतरित झाल्यास विद्यार्थिनींच्या शिक्षणावर तसेच त्यांच्या दैनंदिन प्रवास आणि सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती विद्यार्थिनी व पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने त्र्यंबकेश्वर शहरातच योग्य जागा उपलब्ध करून वसतिगृह अन्यत्र हलविण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, मागण्यांची दखल न घेतल्यास भिमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.यावेळी भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे, नाशिक शहराध्यक्ष मुकुंदराव काळे, त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष हिरामण साळवे, जिल्हा संघटक संजय गांगुर्डे, विश्व हिंदू परिषद सिन्नर तालुका अध्यक्ष धर्माचार्य जय भोले बाबा, युवा नेते प्रशांत गांगुर्डे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »