हरसूल | प्रतिनिधी. – भूस्खलनाच्या घटनेतून परिसर अजून सावरलेला नसतानाच हरसूल परिसरातील घोडमाणी येथे सोमवारी आणखी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. सेंद्री नदीवरील धोकादायक तात्पुरत्या पुलावरून जात असताना पाय घसरल्याने सोमा चिमा चौधरी (वय ६७) हे पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले. सायंकाळपर्यंत महसूल प्रशासन, पोलिस आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविली; मात्र त्यांचा अद्याप शोध लागलेला नव्हता.मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजता सोमा चौधरी हे नातेवाइकांच्या दशक्रिया विधीसाठी घोडमाणी येथून निघाले होते. सेंद्री नदीवरील तात्पुरत्या पुलावरून जात असताना त्यांचा तोल गेला आणि ते थेट पुराच्या पाण्यात कोसळले. नदीला आलेल्या वेगवान पुरामुळे काही क्षणांतच ते प्रवाहात वाहून गेले.घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. काही ग्रामस्थांनी चौधरी यांना पुरात वाहून जाताना पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर महसूल विभाग व हरसूल पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली.
तहसीलदार गणेश जाधव, हरसूल पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पोलिस तसेच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. सकाळपासून सायंकाळपर्यंत नदीकाठावर शोधमोहीम सुरू होती. मात्र मुसळधार पाऊस, वेगवान प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला.स्थानिकांच्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे सेंद्री नदीवरील मूळ पूल वाहून गेला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी लाकडे टाकून तात्पुरती वाट तयार केली होती. याच जीवघेण्या मार्गावरून जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.सलग घडणाऱ्या दुर्घटनांमुळे घोडमाणी व कामथपाडा परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षित आणि कायमस्वरूपी पुलाच्या उभारणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या भागात तातडीने मजबूत पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, हवामान अनुकूल होताच शोधमोहीम अधिक वेगाने सुरू ठेवण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
