फोन पे’वरून घेतली लाच; आरोपीला अटक टाळण्यासाठी पैशांची मागणी, PSIसह तिघांवर ACBचा गुन्हा

बातमी शेअर करा

येवला | प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, दाखल गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी थेट ‘फोन पे’ द्वारे लाचेची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षकासह दोन खाजगी मध्यस्थांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर, तसेच खाजगी मध्यस्थ सुनील शिवाजी बोराडे (वय ३४) आणि जगदीश तुकाराम बोराडे (वय ३७, रा. पाटोदा, ता. येवला) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या भावाला येवला तालुका पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी व अटक टाळण्यासाठी सुरुवातीला ४ लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ही रक्कम अडीच लाख रुपयांवर निश्चित झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल २०२६ रोजी खाजगी मध्यस्थ सुनील बोराडे याने तक्रारदाराकडून ‘फोन पे’द्वारे ५० हजार रुपये स्वीकारले. तर दुसरा मध्यस्थ जगदीश बोराडे याने ही लाचेची रक्कम पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तक्रारदाराला प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी करण्यात आल्याचे तसेच ऑनलाईन माध्यमातून रक्कम स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २७ जुलै २०२६ रोजी येवला तालुका पोलीस ठाण्यात संबंधित तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेष म्हणजे, ज्या येवला तालुका पोलीस ठाण्यात संबंधित अधिकारी कार्यरत होते, त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. सध्या संबंधित पोलीस उपनिरीक्षक श्रीरामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, तपास अधिकारी राहुल कुमार नाईक आणि त्यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »