लासलगाव : भल्या पहाटेच्या अंधारात संशयित वाहनाचा थरारक पाठलाग करत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सराईत दरोडेखोराला गजाआड करण्याची धडाकेबाज कामगिरी लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमोल तळेकर (बॅच क्र. १८३०) यांनी बजावली. त्यांच्या सतर्कतेमुळे एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश झाला असून, ४ लाख ५१ हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. विशेष म्हणजे, अटक केलेला संशयित सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून विविध पोलीस ठाण्यांतील तब्बल १२ गंभीर गुन्हे उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे.
नाकाबंदीत दिसली संशयित कार; तळेकरांची नजर पडताच तपासाला वेग : १८ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ३ ते ५ वाजेच्या सुमारास विंचूर तीन पाटी परिसरात लासलगाव पोलिसांकडून नाकाबंदी सुरू होती. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदार अमोल तळेकर यांना सेंट्रो कार क्रमांक MH 03 AM 3467 संशयास्पदरीत्या फिरताना दिसली.तळेकर यांनी तात्काळ गोपनीय माहितीदारांकडून खात्री केली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत सहकाऱ्यांना सतर्क केले. संशयित वाहनाचा शोध सुरू करताच कार विंचूर-निफाड रस्त्याने वेगाने पळून जात असल्याचे निदर्शनास आले.
फिल्मी स्टाईल पाठलाग; विंचूर एमआयडीसी वळणावर कार अडवली! संशयित कार पळून जात असल्याचे लक्षात येताच अमोल तळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिचा पाठलाग सुरू केला. वेगाने पळणाऱ्या कारचा पाठलाग करत अखेर विंचूर एमआयडीसी वळणावर कारला घेराव घालत ती अडवण्यात आली.कारची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तांब्याच्या वायर तसेच चोरीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले.चौकशीत आरोपीने आपले नाव खुर्शीद अब्दुल हमीद खान, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. इगतपुरी असे सांगितले. पोलिसांच्या चौकशीत त्याने विंचूर-निफाड रस्त्यावरील ‘लोणजाईमाता इलेक्ट्रिकल वर्क्स अँड हार्डवेअर’ दुकानाचे शटर तोडून ३ लाख ५३ हजार २१६ रुपयांच्या तांब्याच्या वायर्सची चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कार, तांब्याच्या वायर आणि चोरीचे साहित्य असा ४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिसांनी आरोपीकडून—- ३,५३,२१६ रुपये किमतीच्या चोरीच्या तांब्याच्या वायर्स- १,००,००० रुपये किमतीची सेंट्रो कार- लोखंडी बोल्ट कटर व पहाड असा एकूण ४,५१,७१६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
खुर्शीद खान हा केवळ विंचूरमधील चोरीपुरता मर्यादित नसून सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या तपासात सायखेडा, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, सिन्नर, इगतपुरी, चांदवड, सटाणा आणि लासलगाव या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दरोडा, घरफोडी व चोरीचे १२ गंभीर गुन्हे उघडकीस आल्याची माहिती आहे.त्यामुळे अमोल तळेकर यांच्या एका संशयित वाहनावरील बारकाईच्या नजरेने केवळ एक चोरी उघडकीस आणली नाही, तर पोलिसांच्या तपासाला मोठे यश मिळवून दिले आहे.ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम., उपविभागीय पोलीस अधिकारी के.के. पाटील, अतिरिक्त कार्यभार संजय बांबळे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.भल्या पहाटे कर्तव्य बजावताना संशयित वाहनावर नजर ठेवून, त्याचा पाठलाग करत आरोपीला जेरबंद करण्याची अमोल तळेकर यांची कामगिरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सतर्क नजर, धाडसी पाठलाग आणि क्षणाचाही विलंब न करता केलेली कारवाई यामुळे तळेकर यांनी ‘कर्तव्य बजावणारा पोलीस’ म्हणजे काय, याचा प्रत्यय दिला आहे.दरम्यान, न्यायालयाने आरोपी खुर्शीद खान याला २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
