इगतपुरी | दि. १० फेब्रुवारी २०२६ ; इगतपुरी तालुक्यातील मौजे खंबाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या सुमेध बुद्धविहार समोरील व सभामंडपालगत केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, या अन्यायाविरोधात इगतपुरी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.सदर ठिकाणी शौचालय व इतर स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम करून सार्वजनिक सभामंडपाचा गैरवापर केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. या अतिक्रमणामुळे सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना अडथळा निर्माण होत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.याबाबत संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला, असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
जोपर्यंत सदर अतिक्रमण पूर्णपणे हटवले जात नाही, सभामंडपाची दुरुस्ती व बंदिस्त काम तात्काळ सुरू होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.या आंदोलनामुळे इगतपुरी तालुक्यात प्रशासनाची भूमिका काय राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, वेळेत निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
