अपघाताचा बनाव करत प्रेयसीची हत्या; दीपक सैंदाणे पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा

वाडीवऱ्हे : सांजेगाव शिवारातील हॉटेल हिरवी मिरचीच्या गेटवर वाहनाची धडक होऊन महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा अपघात असल्याचे दिसत असले तरी पोलिसांच्या तपासात या घटनेमागे घातपाताचा संशय बळावला. अखेर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि वाडीवऱ्हे पोलिसांनी संयुक्त तपास करत या प्रकरणाचा उलगडा केला असून, प्रेयसीची वाहनाने धडक देऊन हत्या केल्याच्या आरोपावरून दीपक शिवाजी सैंदाणे (रा. फडोळ मळा, कामटवाडे, नाशिक) याला अटक करण्यात आली आहे.मृत महिला रुपाली निलेश पाटील (वय ३५, रा. फडोळ मळा, कामटवाडे, नाशिक) आणि संशयित दीपक सैंदाणे यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. मंगळवारी दीपक हा रुपालीला फिरायला जाण्याच्या बहाण्याने सांजेगाव शिवारातील हॉटेल हिरवी मिरची येथे घेऊन जात होता. दरम्यान, प्रवासात दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, याच वादातून संतापलेल्या दीपकने हॉटेलच्या गेटसमोर वाहनाने रुपालीला जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रुपालीचा मृत्यू झाला. घटनेनंतर हा अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांना संशय आला.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि वाडीवऱ्हे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयित दीपक सैंदाणे याची विश्वासात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने रुपालीच्या हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तसेच घटनास्थळावरील साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून, कायदेशीर प्रक्रियेनुसार ‘ई-साक्ष’ देखील नोंदविण्यात आली आहे. तपासातून दीपक सैंदाणे याचाच या हत्येत सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(1) अन्वये हत्या केल्याचे कलम वाढविण्यात आले आहे.पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून, त्याला गुरुवारी न्यायालयात रिमांडसाठी हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती विमला आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे, वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, पोलीस उपनिरीक्षक रामनाथ दिवे, पोलीस कर्मचारी विक्रम काकड, विशाल सोनवणे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व वाडीवऱ्हे पोलिसांच्या पथकाने या गुन्ह्याचा उलगडा केला.सांजेगावातील कथित अपघाताचे गूढ उकलल्याने परिसरात खळबळ उडाली असून, आता या हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »