इगतपुरीत देखील पेट्रोल-डिझेल तुटवडा; वाढलेल्या दरांमुळे नागरिक त्रस्त, पंपांवर ‘इंधन शिल्लक नाही’चे फलक

बातमी शेअर करा

इगतपुरी तालुक्यासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याने “इंधन उपलब्ध नाही” असे फलक लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसून आल्या, तर अनेक नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.अचानक निर्माण झालेल्या या तुटवड्यामुळे प्रवासी, व्यावसायिक, शेतकरी तसेच दैनंदिन कामासाठी वाहनांचा वापर करणारे नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. इंधन मिळवण्यासाठी नागरिकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर फिरावे लागत असून अनेक ठिकाणी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना याचा अधिक फटका बसत आहे.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने नागरिकांच्या नाराजीत आणखी भर पडली आहे. आधीच महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना आता इंधन दरवाढ आणि तुटवडा यामुळे वाहतूक खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम भाजीपाला, दूध, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवरही होऊ शकतो, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.इगतपुरी तालुक्यातील काही पेट्रोल पंप चालकांनी सांगितले की, पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मागणीच्या तुलनेत इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने काही पंपांना तात्पुरते विक्री बंद ठेवावी लागत आहे. काही पंपांवर मर्यादित प्रमाणात इंधन देण्यात येत असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »