‘सर्जा-राजाचा’ पोळा धूमधडाक्यात; मात्र महामार्गावर मोकाट जनावरांची दयनीय अवस्था!

बातमी शेअर करा

साक्ष न्यूज: आज सर्वत्र बैलपोळा सण उत्साहात साजरा होत असताना, नाशिक-मुंबई महामार्गावरील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे शेतकरी आपल्या लाडक्या सर्जा-राजाची पूजा करून पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असताना, दुसरीकडे त्याच पाळीव जनावरांची महामार्गावर होणारी हेळसांड आणि बेवारस अवस्था चिंताजनक असल्याचे चित्र दिसून येत आहे.नाशिक-मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे, रायगडनगर, व्हिटिसी फाटा तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत. वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या या महामार्गावर जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना वाहने नियंत्रित करणे कठीण होते. त्यामुळे वाहतूक कोंडीसोबतच गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र, सणाच्या या उत्साहामागील वास्तव म्हणून महामार्गावर भटकणाऱ्या जनावरांची अवस्था समाजमनाला विचार करायला लावणारी आहे. ज्या जनावरांना वर्षभर कुटुंबाचा सदस्य मानले जाते, त्यांनाच नंतर मोकाट सोडले जाते का? असा सवालही उपस्थित होत आहे.महामार्गावर मोकाट जनावरांमुळे एखादा मोठा अपघात घडण्यापूर्वी संबंधित प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. जनावरांच्या मालकांवर आवश्यक ती कारवाई करण्यासोबतच मोकाट जनावरांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.पोळा सण हा केवळ बैलांची पूजा करण्याचा दिवस नसून, त्यांच्या सुरक्षिततेची आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस ठरावा, हीच अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »