साक्ष न्यूज: आधुनिक धावपळीच्या जीवनात सण-उत्सवांचा पारंपरिक आणि कृषी संस्कृतीशी असलेला संबंध हळूहळू कमी होत असताना, पोलीस दलात कार्यरत असलेल्या रविराज शिंदे यांनी आपल्या महिन्याच्या पगारातून स्वतःच्या बैलजोडीचा साजशृंगार करून अनोख्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला. त्यांच्या या उपक्रमाचे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी, नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून भरभरून कौतुक होत आहे.बैलपोळा हा केवळ बैलांची पूजा करण्याचा सण नसून, शेतकरी आणि त्याच्या शेतीच्या कामात आयुष्यभर साथ देणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. याच भावनेतून रविराज शिंदे यांनी शहरातील आपल्या राहत्या घरी बैलजोडीला आकर्षक साज चढवून, त्यांची पूजा केली. तसेच मित्रमंडळी व नातेवाईकांसाठी गोडधोडाची व्यवस्था करून उत्साहात पोळा साजरा केला.रविराज शिंदे हे पोलीस दलात कार्यरत असले तरी त्यांची नाळ ग्रामीण जीवनाशी घट्ट जोडलेली आहे.
मोखाडा तालुक्यात शंभर हेक्टर शेती करणाऱ्या त्यांच्या आजोबांच्या कृषी कार्याचा वारसा आणि त्यांच्याप्रती असलेला सन्मान त्यांच्या मनात कायम आहे. शिक्षणाच्या जोरावर पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्यांनी कुटुंबासाठी अनेक खर्च केले; मात्र यंदाच्या बैलपोळ्याला स्वतःच्या बैलजोडीवर खर्च करून त्यांनी शेती आणि पशुधनाप्रती असलेली आपली कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी उपस्थितांनी सांगितले की, माणूस स्वतःवर आणि कुटुंबावर मोठ्या प्रमाणात खर्च करतो; मात्र आपल्या ताटात अन्नधान्य पोहोचविणाऱ्या बळीराजाला आणि त्याच्या शेतीत खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या बैलांना विसरतो. बैल हा शेतकऱ्याचा केवळ पशू नसून खरा सहकारी आणि मित्र आहे.रविराज शिंदे यांच्या या उपक्रमामुळे पारंपरिक बैलपोळ्याच्या सणाला आधुनिक काळातही संवेदनशील आणि कृतज्ञतेची नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या या कृतीचे त्र्यंबकेश्वर परिसरातील शेतकरी व नागरिकांनी कौतुक करत ‘शेतीच्या मित्राचा सन्मान करण्याची हीच खरी पोळ्याची भावना’ असल्याचे सांगितले.
