साक्ष न्यूज: भावली धरण परिसरात स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उत्साहात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पर्यटकांनी धरण परिसरात कचरा न टाकता निसर्गाचे सौंदर्य आणि परिसराची स्वच्छता कायम राखावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.दारणा नदी सेवक व ‘एक मित्र एक वृक्ष’चे बंटी पगारे यांच्या पुढाकारातून तसेच नवीन शिंदे, सूर्या भगत, चंद्रवदन चंद्रमोरे, विजय चंद्रमोरे, हरिष उघडे व मित्रपरिवाराच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य – इगतपुरी तालुका यांच्या सहकार्याने भावली धरण परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या अभियानात भावली ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी रुपाली जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भावलीचे मुख्याध्यापक युवराज सूर्यवंशी, श्याम उबाळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रमिला उबाळे, गीता उबाळे, सुनीता दरवडे यांच्यासह स्थानिक टपरीधारकांनी सहभाग घेतला.भावली धरण परिसरात वाढणारे पर्यटकांचे प्रमाण लक्षात घेता कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. धरण, नदी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक व पर्यटकांनी प्रशासनासोबत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.‘नदी वाचवा, निसर्ग वाचवा; कचरा करू नका, परिसर स्वच्छ ठेवा’ या संदेशातून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यात आली.
