
काळू गांगुर्डे (साक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतकरी व आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज प्रचंड जनक्षोभ उसळला. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने त्र्यंबकेश्वरमधील जव्हार फाटा येथे भव्य ठिय्या आंदोलन करण्यात आले. हरसूल येथून पायी चालत आलेल्या हजारो आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने दुपारी १.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.आज सकाळपासूनच जव्हार फाटा परिसर लाल झेंड्यांनी आणि जोरदार घोषणाबाजीने दणाणून गेला होता. अखिल भारतीय किसान सभा, त्र्यंबकेश्वर तालुका कमिटीच्या वतीने शेतकरी व आदिवासींच्या ३७ प्रलंबित मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते.
आज सकाळपासूनच जव्हार फाटा परिसर लाल झेंड्यांनी आणि जोरदार घोषणाबाजीने दणाणून गेला होता. अखिल भारतीय किसान सभा, त्र्यंबकेश्वर तालुका कमिटीच्या वतीने शेतकरी व आदिवासींच्या ३७ प्रलंबित मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते.दुपारी आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोखून धरत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. यामुळे नाशिक–त्र्यंबकेश्वर आणि जव्हारकडे जाणारी वाहतूक तब्बल चार तास ठप्प राहिली. नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.यावेळी किसान सभेचे नेते इरफान शेख यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करत प्रशासनाच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जलजीवन मिशनमधील कथित भ्रष्टाचार, रेशन कार्ड, पेन्शन योजना, तसेच मूलभूत सुविधांतील त्रुटी यांसह अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.आंदोलन सुरू होऊन बराच वेळ झाला तरी वरिष्ठ अधिकारी न आल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप वाढत गेला. तहसीलदार जाधव हे आंदोलनस्थळी उशिरा पोहोचल्याने कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर प्रशासनाने मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिल्यानंतर निवेदन स्वीकारण्यात आले.तहसीलदारांच्या आश्वासनानंतर हे ठिय्या आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले. मात्र, शेतकरी आणि आदिवासी बांधवांचा लढा इथेच थांबलेला नसून, आपल्या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी हे सर्व आंदोलनकर्ते जव्हार फाट्यावरून नाशिकच्या दिशेने पायी रवाना झाले आहेत.आता या आंदोलनातून मांडण्यात आलेल्या मागण्यांकडे शासन कोणत्या गांभीर्याने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
